कोरोना विषाणू आहे काय?
सुरुवातीच्या रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं.
कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे.
कोरोनाची लक्षणे
कोरोना व्हायरस थेट तुमच्या फुप्फुसांवर हल्ला करतो. यामुळे तुमच्या दोनपैकी एक लक्षण दिसू लागतं – एक तर ताप किंवा कोरडा खोकला. यापैकी काहीही झालं तरी श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.
मात्र हा खोकला काही थांबत नाही. असंही होऊ शकतो की तुम्ही तासन् तास खोकतच आहात, किंवा दिवसांतून तीन-चार वेळा सातत्याने खोकत आहात. तुमच्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकतं, त्यामुळे जरा जपूनच.
जेव्हा ताप येतो तेव्हा तुमच्या शरीराचं साधारण तापमान 37.8 सेल्सियसपेक्षा जास्त असू शकतं. यामुळे तुम्हाला जरा कणकण वाटू शकते, थंडी वाजू शकते किंवा थरथरल्यासारखंही वाटू शकतं.
याची लक्षणं दिसायला कधी पाच दिवस लागू शकतात तर कधी त्याहून जास्त. WHOनुसार हा व्हायरस आपले परिणाम तुमच्या शरीरात दाखवण्यास 14 दिवससुद्धा घेऊ शकतो. यालाच इनक्युबेशन पिरियड म्हणतात.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिलेल्या ताज्या माहितीनुसार खालीलपैकी कोणतंही लक्षण तुमच्यात दिसलं की सतर्क व्हायला हवं –
- ताप किंवा थंडी वाजणे
- थरथरणे
- स्नायूंमध्ये दुखणे
- डोकेदुखी
- खोकला किंवा घसा खवखवणे
- चव न कळणे किंवा वास न येणे
पूर्वी ही लक्षणांची यादी फक्त फक्त ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास, एवढीच होती.
24 मे ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी सांगितलं आहे की थकवा येणं आणि तोंडाची चव जाणं ही देखील लक्षणं आहेत. युनायटेड किंगडम सरकारने देखील ही नवी लक्षणं असल्याचं सांगितलं आहे. सातत्याने खोकला येणं, तोंडाची चव जाणं, वास न येणं ही लक्षणं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
मृत्यूचा धोका किती?
या रोगामुळे मरणाऱ्यांचा प्रमाण हे कमी आहे, सुमारे 1 ते 2 टक्के. पण हे आकडे पूर्णतः विश्वासार्ह नाहीत.
काही ठिकाणी रोगाचं निदान करण्याची पुरेशी व्यवस्था नाही तर काही दुसऱ्या ठिकाणी लक्षणं दिसत नसल्यामुळे रुग्णांची ओळखच पटत नाहीय.
जागतिक आरोग्य संघटनेने सुमारे 65 हजार रुग्णांचा अभ्यास करून तयार केलेल्या आकडेवारूनुसार –
- 6 टक्के रुग्ण चिंताजनक परिस्थितीत पोहोचतात – म्हणजे त्यांची फुप्फुसं निकामी होतात, त्यांना इतर संसर्ग होतात, अवयव निकामी होतात आणि मृत्यूचा धोका ओढवतो.
- 14 टक्के रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं दिसतात – श्वास घेण्यास त्रास होतो इत्यादी.
- तर सुमारे 80 टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसतात – जसं की ताप, खोकला किंवा न्युमोनियाची लक्षणं
आतापर्यंतच्या आकडेवारीवरून असं लक्षात येतं की ज्यांना आधीच कुठला ना कुठला आजार आहे – जसं की दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार – त्यांना या रोगाची लागण होण्याची जास्त शक्यता आहे. आकडेवारी असंही सांगते की पुरुषांच्या जीवाला महिलांपेक्षा जास्त धोका आहे.
मग मी काय करावं?
कोरोना विषाणूचा प्रसार खोकला किंवा शिंकेतून बाहेर पडणाऱ्या तुषारांमधून किंवा असे तुषार पडलेल्या जागी स्पर्श केलेला हात नाका-तोंडाला लागल्यानं होत असल्याचं आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून आलं आहे.
तसंच गर्दीच्या ठिकाणी अशा संसर्गाचा धोका जास्त असल्याचं तज्ज्ञांनी वारंवार सांगितलं आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी खालील गोष्टी नियमितपणे करा –
- आजारी व्यक्तींच्या फार जवळ जाऊ नका.
- हात न धुता तोंड, नाक, डोळे, कान यांना स्पर्श करू नका.
- शिंकताना आणि खोकलताना टिशू पेपर वापरा. वापरून झाल्यावर तो कचरापेटीत टाकून हात स्वच्छ धुवा.
- साबणाने नियमित हात धुवा.
मास्क वापरल्यामुळे खरंच कोरोना रोखता येता का, याबाबत WHO अजूनही खात्रीशीरपणे सांगू शकत नसल्याचं म्हणतंय. पण तोवर गर्दीच्या ठिकाणी जाणार असाल तर तो नक्कीच वापरा.