तृतीयपंथ (छक्का ) म्हणजे फक्त एक शब्द नाही तर यासोबत जोडली जाते ती म्हणजे घृणा, तिरस्कार, असहाय्य अशी पीडा, मनुष्य असूनही जनावरासारखी वागणूक जसे काही ते आपल्या सुशिक्षित समाज्यामधील नको असलेली गोष्ट. अशी जिवंत वस्तू जी समोर आली तर आपण तोंड फिरवतो, आपला मार्ग बदलतो, जणू काही तिचा स्पर्श होताच आपणास एखादा महारोग जडला जाईल, बहुतेक तुम्ही हि अनेकदा असे केले असेल किव्वा पाहिले असेल.
काय खरेच तृतीयपंथ या सामाज्याला लागलेला शाप असतात ? का फक्त आपणच आपल्या व्यवहाराने त्यांना हि जाणीव करून देतो कि तुम्हाला या जगात आनंदाने सगळ्यांसोबत आयुष्य जगायचा काहीही अधिकार नाही कारण निसर्गाने तुम्हाला या स्वार्थी आणि असंवेदनशील लोकांपेक्षा वेगळे शरीर प्रधान केले, असे शरीर जे कधीही पुरुषार्थाचा अहंकार करत नाही किव्वा जे शरीर एखादया स्रीप्रमाणे कोणाला मोहित करत नाही, तरी देखील हा समाज यांना स्वीकारत नाही प्रत्येक मनुष्य तृतीयपंथाकडे एका विचित्र वेदनादायक नजरेने पाहत असतो अशी नजर जी प्रत्येक क्षणी असंख्य घाव यांच्या मनावर करत असतील, तृतीयपंथ समाज हा काही अलीकडे उदयास आला आहे असे देखील नाही कारण कित्येक धार्मिक ग्रंथांमध्ये याच तृतीयपंथांचा उल्लेख पाहावयास मिळतो इतकेच नाही तर साक्षात महादेवाने सुद्धा अर्धनारी स्वरूप धारण केले होते, असे कित्त्येक उल्लेख हे आपल्याच निदर्शनात असतील, जिथे एका ठिकाणी तृतीयपंथी लोकांची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद हा चांगला समजला जातो, इतकेच नाही तर बहुतेक लोक हे तृतीयपंथी लोकांना नाराज करणे टाळतात कारण काही मान्यता अश्या देखील आहेत कि तृतीयपंथी लोकांचा शाप हा खूपच प्रभावशाली असतो, परंतु कित्तेक लोक यांचा सतत कोणताही विचार न करता अपमान तिरस्कार करतात याचा किती परिणाम त्यांच्या आयुष्यावर होत असेल, परंतु आपणास याची जाणीव कधीही होत नाही.
जे तृतीयपंथी लोक जिवंतपणी संपूर्ण आयुष्य इतका त्रास आणि वेदने सोबत आयुष्य जगतात तर विचार करा मरणानंतर यांच्या सोबत काय घडत असेल ? बहुदा तुम्ही याची कल्पना देखील करू शकत नाही, कारण तृतीयपंथी लोक जेव्हा मरण पावतात तेव्हा त्यांच्या शरीरासोबत काय होते हे अनेकदा रहस्य मानले जाते कारण तृतीयपंथी लोकांचे पार्थिव हे कधीच दिवसा घेऊन जात नाहीत याचे मुख्य कारण असे कि आयुष्यभर ज्या सामाज्याने त्यांचा तिरस्कार केला अश्या सामाज्याची नजर त्यांच्या शरीरावर पडू नये म्हणून त्यांचे शरीर हे रात्री दफन केले जाते तसेच त्यांच्या शरीरावर चप्पल बुटाने मारले सुद्धा जाते, असे करण्यामागे एक परंपरा अशी मानली जाते कि आयुष्यभर त्यांना जो त्रास आणि वेदना सहन कराव्या लागल्या त्या फक्त याच शरीरामुळे. तसेच तृतीयपंथी समाज त्यांच्याच एकाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुःख न करता आनंद व्यक्त करतात कारण या असंवेदनशील जगातून त्यांना मुक्ती मिळालेली असते. असे अनेक विचित्र वाटणारे परंतु त्यांच्या जीवनाचा एक भाग असणारे तथ्य आपण पुढे पाहणार आहोत .